ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहिली पत्नी जिवंत असतानाच बनावट मृत्यू दाखला; सोलापुरातील पतीचा असाही कारनामा !

लातूर : वृत्तसंस्था

पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी वैभव गोपीनाथ जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर महानगरपालिका येथील जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचे निबंधक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शंकरराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने २३ मे २०२३ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खोटी कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. पत्नीचा मृत्यू झाल्याचे खोटे दाखवत त्याने महापालिकेकडून अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळवले.

या बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे आरोपीने दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे, त्या विवाहाची नोंदणीही लातूर महानगरपालिका येथील अधिकृत नोंदवहीत करून घेतल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाने अंतर्गत पडताळणी केली असता सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली. त्यानंतर तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेतील पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!