वाशीम : वृत्तसंस्था
गतवर्षी पिकांचा विमा काढल्यानंतर देखील नुकसानीपोटी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त शेतकरी विमा कंपनीत गेले असता तेथूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट कार्यलयातील सामानाची तोडफोड केली. वाशिम जिल्ह्यात ही घटना घडली.
शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा भरला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा देणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्याने संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी वाशिमच्या कारंजा येथील पिक विमा कार्यालयात पोहचून विम्याची रक्कम देण्याची मागणी केली. मात्र विमा प्रतिनिधीने अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी व कार्यकर्ते अधिक संतप्त झाले व साहित्याची नासधूस केली.
कारंजा तालुक्यातील २०२३ साली ७० हजार ५८० शेतकऱ्यांनी पिकं विमा भरला होता. यात २५ हजार १७५ शेतकऱ्यांनी तक्रारी केली होत्या. यात केवळ ६ हजार ८७२ पीक विमा मिळाला. तर १८ हजार ३०३ शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.