पुणे : वृत्तसंस्था
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. अॅग्री स्टॅक या अॅपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून, ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ई- पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अॅप विकसित करण्यात आले आहे. याच अॅपच्या धर्तीवर केंद्र सरकारनेदेखील सबंध देशासाठी एकाच अॅपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले असून, येत्या खरीप हंगामापासून देशभरात एकाच अॅपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होत आहे.