ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात : अक्कलकोटमध्ये ४ जणांचा मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी

जगातील अनेक देशात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात व्हावे, यानिमित्ताने राज्यातील सर्वच प्रमुख तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चारचाकीचा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.

सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून हा भीषण अपघात आज (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातातील मृतांची नावे अनिता परशुराम कुटे (वय ४८, रा. छ. संभाजीनगर) , भागवत यशवंत चौरे (वय ४७), सृष्टी भागवत चौरे (वय १३), वेदांत भागवत चौरे (वय ११, सर्व रा.अंबड रोड जालना) येथील रहिवाशी आहेत. गाडीचा चालक जखमी झाला आहे. परशुराम लक्ष्मण कुटे ५५ हे स्वतः गाडी चालवत होते. ते छ.संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत चौरे (वय ४०, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत. अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!