नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली आहे. नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदी सरकार सुरुच ठेवणार आहे. येत्या पाच वर्षात आणखी २ कोटी घरे निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत म्हटलं की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. सरकारचे लक्ष्य पारदर्शक कारभारावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. सोबतच 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे. आपली अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आमचे सरकारही राज्यांना विकासासाठी मदत करेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, आमच्या सरकारने प्रत्येक घरात पाणी, वीज, गॅस, आर्थिक सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. अन्नधान्याची चिंता दूर करण्यात आली आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.