ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी आग

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. दिल्लीतल्या लुटियन्स झोनमधील मदर टेरेसा क्रिसेंट रोडवरील त्यांच्या घरातील एका खोलीत असलेल्या बेडला सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आले. फायर ब्रिगेडचे तीन फायर टेंडर्स काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ८.३० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.

रविशंकर प्रसाद यांचे हे घर दिल्लीतील अतिसुरक्षित आणि खास मानल्या जाणाऱ्या लुटियन्स झोनमध्ये असून, आगीच्या घटनेमुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या. आगीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, शॉर्ट सर्किट की इतर कोणतं कारण याचा तपास सुरू आहे.

घटनास्थळी अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे पथक दाखल झाले असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. राजधानीतील एका वरिष्ठ नेत्याच्या निवासस्थानी आग लागल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!