ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात अग्नितांडव : दीड कोटींचे नुकसान

सोलापूर : प्रतिनिधी

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला (अन्नपूर्णा टेक्स्टाइल्स मिल) दि.३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कच्चा पक्का माल, मशिनरीसह जवळपास कोटी दीड कोटींचे नुकसान झाले. या आगीत जीवित हानी झाली नाही. परंतु आग एवढी भीषण होती की, ती विझवण्याकरिता तब्बल आठ तास लागले. अग्निशमन दलाच्या ५० बंबाच्या मदतीने दुपारी ४.३० च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट रोड एमआयडीसीत प्रमोदकुमार गुलाबचंद दरगड यांच्या मालकीची अन्नपूर्णा टेक्स्टाईल मिल असून, यामध्ये टॉवेलचे उत्पादन होते. बुधवारी जवळपास सर्वच कारखान्यांना सुट्टी असते. गर्दी नसल्याने ही बाब लक्षात आली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. येथील नागरिकांनी ही घटना लक्षात येताच एमआयडीसी अग्निशामक विभागाला माहिती दिली.

अग्निशमन दलाची गाडी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली. परंतु आग एवढी मोठी असल्यामुळे अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी शहरातील चारही ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पाचारण केल्या. तसेच चिंचोली एमआयडीसी या परिसरातीलही एका गाडीचा यासाठी वापर केला. कारखान्याच्या पत्रा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात टॉवेल बनवण्याचा कच्चा पक्का माल, टिफीओ मशीन, वायरिंग, डब्लिग, पॅकिंग, मटेरियल या आगीत भक्षस्थानी पडले. पत्रा शेड हलवण्यासाठी अग्निशामक दलाने महानगरपालिकेच्या जेसीबीच्या साह्याने संपूर्ण पत्रा शेड बाजूला हलवले आणि आग आटोक्यात आणली. या परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही आग पसरणार नाही, याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली गेली. आजूबाजूला प्लास्टिक कारखाना तसेच दोन टॉवेलचे कारखाने होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारखान्याचे मालक दरगड यांनी याविषयी फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!