तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.३१ : धोत्री ( ता-दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर या कारखान्यांनी सन २०२२ – २३ या गळीत हंगामामध्ये येणाऱ्या उसास पहिली उचल म्हणून २२५० रुपये जाहीर केल्याचे गोकुळ शुगर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी सांगितले. सध्या गोकुळ शुगर कारखाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. शिंदे यांनी दराच्या बाबतीत पत्रक काढून घोषित केले आहे.
मागील गाळप हंगामा मधील सन २०२१ -२०२२ मधील आलेल्या उसास शिंदे यांनी १२१ रुपयेप्रमाणे दीपावली सणासाठी शेतकऱ्यांना हप्ता वाटप करुन उस उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड केली होती. मागील वर्षी गाळप केलेल्या कार्य क्षेत्रातील उसाला धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने प्रति टन २१२१ रुपये दर देण्यात आला आहे. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन गोकुळ शुगर धोत्री कारखान्याचा पहिला हप्ता २२५० रुपये जाहीर केला आहे.
यंदा कार्यक्षेत्रातील उसाची लागवड वाढल्या मुळे १५ ऑक्टोबर पासूनच कारखाना गळीत हंगामाला जोमात सुरु आहे. गतवर्षी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दीपावळीसाठी प्रत्येकी २० किलो साखर प्रति किलो २० रुपये दराने वितरित करण्यात आली आहे. गोकुळ शुगरच्या परिसरात वाढलेले उसाचे क्षेत्र आणि कारखान्याची वाढीव गाळप क्षमता याचा विचार करता यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने दहा लाख मॅट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती चेअरमन शिंदे यांनी दिली. तरी उस उत्पादक शेतकरी बांधवांनी चालू गळीत हंगामात गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे, कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे, कार्यकारी संचालक कपिल शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी संचालक गणपत शिंदे, कुसुम शिंदे,मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, बाबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर प्रदीप पवार, अभिजीत गुंड, शेती अधिकारी शेंडगे जहागीरदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.