नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार असून कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील मालदा टाऊन येथे या ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन हावडा जंक्शन आणि कामाख्या दरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच कालावधीत 6 नवीन अमृत भारत एक्सप्रेस देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, त्यांची सेवा 17 आणि 18 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. यामुळे देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासाला नवे बळ मिळणार आहे.
दिल्ली येथे झालेल्या अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार समारंभात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी परिवर्तनाचे ठरणार आहे. रेल्वेच्या विविध सुधारणा, देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी नवीन संरचनात्मक धोरण राबवले जाणार असून, त्याद्वारे देशातील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण कल्पना रेल्वेशी जोडल्या जातील. यासाठी एक तंत्रज्ञान नवोपक्रम पोर्टल सुरू करण्यात येणार असून, देखभाल आणि संचालनात AI महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे प्रारंभिक भाडे अत्यंत परवडणारे ठेवण्यात आले आहे.
* थर्ड एसी : ₹2,300
* सेकंड एसी : ₹3,000
* फर्स्ट एसी : सुमारे ₹3,600
ही स्लीपर ट्रेन 1,000 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आली आहे. वर्षाअखेरीपर्यंत सुमारे 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील, अशी माहितीही देण्यात आली.
30 डिसेंबर रोजी झालेल्या चाचणीदरम्यान ही ट्रेन 180 किमी प्रतितास वेगाने कोटा–नागदा मार्गावर धावली. विशेष म्हणजे, इतक्या वेगातही लोको पायलटनी ठेवलेल्या ग्लासमधील पाणी सांडले नाही, यावरून ट्रेनच्या उत्कृष्ट सस्पेंशन आणि स्थिरतेची प्रचिती आली.
प्रगत सुरक्षा प्रणाली, जागतिक दर्जाचे स्लीपर कोच आणि आरामदायी प्रवास ही वंदे भारत स्लीपरची वैशिष्ट्ये आहेत. सध्या गुवाहाटी–हावडा मार्गावर विमान भाडे ₹6,000 ते ₹10,000 दरम्यान असते, मात्र वंदे भारत स्लीपरमुळे प्रवाशांना कमी खर्चात जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.