ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येत राम नवमीला बुधवारी लाखो भाविकांनी भगवान रामलल्लाचे दर्शन घेतले. सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येत राम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा लावला गेला. अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा प्रयोग ‘याची देही याची डोळा’ अयोध्येतील मंदिरात भाविकांनी पाहिला. देशभरात टीव्हीचा माध्यमातून या सोहळ्याचा आनंद कोट्यवधी भाविकांनी घेतला. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर ही पहिली रामनवमी होती. ट्रस्टने वैदिक विधीनुसार विशेष पूजा केली. त्यानंतर भगवंताच्या कपाळावर दुपारी १२ वाजता सूर्यकिरणांचा टिळा लावला. कसा करण्यात आला होता हा प्रयोग…त्यासाठी सूर्याचा अभ्यास करणारी आदित्य एल 1 च्या टीमने काम केले.

बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ( IIA)या संस्थेने ही कामगिरी बजावली. याच संस्थेमधील वैज्ञानिकांनी इस्रोच्या सहकार्याने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L1 पाठवले आहे. अयोध्या मंदिर ट्रस्टने मंदिराच्या बांधकामा दरम्यान या संस्थेला संपर्क केला होता. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहात रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणे थेट प्रभू श्रीरामाच्या कपाळावर पडतील, अशी व्यवस्था करण्याचे सांगितले होते.

राम नवमीला प्रभू श्री रामाच्या कपाळावर सूर्य टिळक लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी ऑप्टिकल मेकॅनिकल प्रणाली तयार केली होती. IIA मधील शास्त्रज्ञांच्या टीमने ही यंत्रणा बसवण्यासाठी काम केले. मंदिर अजून पूर्ण झालेले नाही. यामुळे वर्तमान आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. दुपारी १२ वाजता सूर्यकिरण कोणत्या पोजिशनमध्ये असतात, त्याचा अभ्यास करण्यात आला.

सूर्य किरणे श्री रामलल्लाच्या मूर्तीवर कपाळावर पोहचवण्यासाठी चार लेन्स आणि चार आरसे वापरुन प्रणाली तयार केली. सध्या ही सिस्टीम अस्थायी आहे. मंदिर पूर्ण झाल्यावर ती स्थायी रुपाने बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी राम नवमीला भवगान राम यांच्या कपाळावर सूर्य किरणांचा टिळा लावला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!