मुंबई : वृत्तसंस्था
बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत देखील सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली दोन दिवसांत आणखी तीव्र होऊन ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळेच राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
कुठे कोणता अलर्ट?
हवामान खात्याकडून आज रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, कोल्हापूर, यवतमाळमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीममध्ये विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदजार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळं अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे. त्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.