ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळाला असला तरी.. वाचा सविस्तर

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मिळाला असला तरी १३ ऑक्टोबरपर्यंत जामीन देता येणार नाही. ईडीला सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी जामीन आदेशाला तोपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

ईडीने अनिल देशमुखांच्या जामिनास विरोध केला आहे. जामिनाविरोधात शासनाच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामिनास १३  ऑक्टोबरपर्यत स्थगिती दिली आहे. त्यामुळे जामिन मिळाला असला तरी देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही,  हे आता स्पष्ट झाले आहे.

अनिल देशमुख यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती निजामोद्दीन जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. मंगळवारी दुपारी झालेल्या या सुनावणीवेळी न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला. तरीही अनिल देशमुख यांना ऑर्थर रोड कारागृहातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. अद्याप त्यांची सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह काही जणांची चौकशी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!