भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे. सलीम दुर्रानी यांनी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. आक्रमक फलंदाजीसोबतच ते ऑफ-स्पिन गोलंदाजीही ओळखले जात होते.
सलीम दुर्राणी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम अझीझ दुर्राणी होते. सन १९६१-६१ मध्ये सलीम दुर्रानी यांनी भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होता. त्यांनी कोलकाता आणि मद्रास कसोटीत अनुक्रमे ८ आणि १० विकेट्स घेऊन भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी अशीच कामगिरी करत भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटी जिंकून दिली.
सलीम दुर्रानी यांनी जानेवारी १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यांनी जवळपास १३ वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. कसोटीत एक शतक आणि ७ अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी १ हजार २०२ धावा केल्या.त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १०४ धावा होती. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८ हजार ५४५ धावा केल्या आहेत. सलीम दुर्राणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ शतके आणि ४५ अर्धशतके झळकावली.