ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मंत्री दानवेंच्या चारचाकीचा अपघात !

पुणे : वृत्तसंस्था

भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला. एक दुचाकीस्वार भरधाव वेगात येऊन रावसाहेब दानवे यांच्या कारला मागच्या बाजूने धडकला. हा अपघात लोणावळा येथील जयचंद चौकात झाला. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही व रावसाहेब दानवेही सुखरूप आहेत. परंतु दुचाकीस्वाराने दानवेंशी हुज्जत घातल्याचे वृत्त समोर आले आहे.

रावसाहेब दानवे यांच्या कारला एका दुचाकीस्वाराने मागून धडक दिली आणि त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या मित्रांनाही तिथे बोलावून घेतले. या मुलांनी रावसाहेब दानवे यांच्या कारवर चढण्याचा देखील प्रयत्न केल्याचे स्थानिकांकडून समजते. तरुण हुज्जत घालत असताना स्थानिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि एका रिक्षा चालकाने रावसाहेब दानवे यांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचे कार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण जेव्हा हुज्जत घालत होता, तेव्हा काही स्थानिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हे मंत्री आहेत तेव्हा ते शांत झाले. पण ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी स्थानिक व रिक्षा चालकाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला. तसेच रावसाहेब दानवे यांनी देखील वाद वाढू नये म्हणून काढता पाय घेतला.

अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही देखील ठप्प असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात असलेल्या दुकानदारांनी स्वतःच्या दुकानापूर्तेच कॅमेरे बसवले आहेत. पोलिस यंत्रणेने बसवलेले सीसीटीव्ही मात्र बंद असल्याचे दिसून आले आहे. लोणावळा सारख्या पर्यटन ठिकाणी मंत्री देखील सुरक्षित नाहीत, त्यांच्या कारवर गुंड प्रवृत्तीची मुले चढण्याचा प्रयत्न करतात, हुज्जत घालतात, तिथे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!