बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांना दिला जाणारा रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. यावरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलेलं पत्र पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर शेयर केलं आहे. या पत्राद्वारे पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सद्याच्या परिस्थितीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ हजार ९८९ लोक आतापर्यंत बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असले तरी रेमदेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुरेसे लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या सार्याकडे आपण जातीनं लक्ष घालावं, ताबडतोब रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं अशी विनंती भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून केली आहे.
राज्याला मिळालेल्या लसीच्या दोन लाख डोसेसपैकी केवळ २० डोस बीड जिल्ह्याला मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहेत. व खेदकारक आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लसीचे पुरेसे डोसेस उपलब्ध करून घ्यावेत असेही भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहेत.