ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा शेतकऱ्यांनी केला दुग्धाभिषेक ; नायक चित्रपटाची आठवण झाली : माजी मंत्री म्हेत्रे

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याच्या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास ३० कोटींचा निधी मिळाला. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने संपन्न झाली आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चपळगाव व कुरनूर येथील शेतकऱ्यांनी म्हेत्रे यांचा चक्क दुधाने अभिषेक केला. शेतकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या सत्काराची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.

अक्कलकोट तालुक्यात यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. परंतु शासनाकडून केवळ किनी मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश होते. वास्तविक संपूर्ण तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते ही बाब माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली.अक्कलकोट तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे पंचनामे व्हावेत यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली.

एवढ्यावरच न थांबता माजी मंत्री म्हेत्रे यांनी तात्काळ मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची १२५ टक्के रक्कम मिळावी यासाठी निवेदन सादर केले. आणि याचेच फलित म्हणून शासनाकडून अक्कलकोट तालुक्याला किणी मंडलाव्यतिरिक्त तब्बल ३१ कोटींचा निधी मंजूर झाला आणि ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना हा निधी मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याचीच जाणीव ठेवून सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दूधाने म्हेत्रे यांचा दुग्धाभिषेक केला.

यावेळी अशपाक बळोरगी, सभापती प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, सद्दाम शेरीकर, महेश जानकर, सलिम येळसंगी, मल्लिकार्जुन काटगाव, बसवराज अळ्ळोळी, सिध्दार्थ गायकवाड, शिवप्पा कुंभार, रामु समाणे, वसंत देडे, हिळ्ळी सर, दिलीप काजळेसह तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चपळगाव येथील सिध्दाराम भंडारकवठे, धानप्पा डोळ्ळे,खंडप्पा वाले, सोमनाथ बाणेगांव,ब्रम्हानंद म्हमाणे, अविनाश इंगुले, बसवराज हन्नुरे, विजय कांबळे या शेतकऱ्यांकडुन तर कुरनुरमधील सरपंच व्यंकट मोरे, अयुब तांबोळी, सुरेश बिराजदार, दयानंद मोरे, अजय शिंदे, केशव मोरे, अप्पा शिंदे, संभाजी बेडगे, किशोर सुरवसे, स्वामीराव सुरवसे, लक्ष्मण शिंगटे, नारायण मोरे आदी शेतकऱ्यांनी हा दुग्धाभिषेक केला.

विरोधकांनी विटेवर वीट नाही ठेवली

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दुधाने अभिषेक करण्यामागचा उद्देश व्यक्त करत असताना कुरनूर गावचे सरपंच व्यंकट मोरे यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला.यावेळी व्यंकट मोरे म्हणाले की सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी अनेक त्याग केले आहेत.कुरनूर धरण,एकरूख उपसा सिंचन योजना,मातोश्री-गोकूळ कारखान्याची निर्मिती यासह तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी मैत्री यांनी प्रयत्न केले असून विरोधकांनी मात्र विटेवर वीट ठेवली नाही असा आरोप केला.

नायक चित्रपटाची आठवण झाली; आयुष्याचे सार्थक झाले

आज वरचा राजकारणात अनेक सत्कार स्वीकारले परंतु आजचा सत्कार लाख मोलाचा ठरला. जगाच्या पोशिंद्याकडून मिळालेला हा सन्मान हा फार मोठा आशीर्वाद आहे.शेतकऱ्यांनी केलेला दुग्धाभिषेक पाहून नायक चित्रपटातील अनिल कपूरची आठवण झाली. या पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चितपणे करणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!