अक्कलकोटमध्ये ‘या’उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी केल्या आठवणी गोड !
१९७९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केला एक लाखांचा खर्च
अक्कलकोट : प्रतिनिधी
शाळेतील जुन्या आठवणींना सामाजिक बांधिलकीची भावनात्मक जोड देत, अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल व इतर शाळांच्या १९७९ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत दुसऱ्या वर्षी सलगपणे गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला आहे. तब्बल १ लाख रुपयांची वर्गणी गोळा करून गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेनचे वाटप करत त्यांनी सामाजिक जाणीव जपली.
या उपक्रमासाठी ३० ते ३५ माजी विद्यार्थी एकत्र आले असून त्यांनी अक्कलकोट येथील न.प. मुलांची शाळा नं. १, प्रमिलाराजे गर्ल्स स्कूल, श्री शहाजी हायस्कूल, वरिष्ठ प्राथमिक शाळा आणि न.प. मुलींची शाळा नं. १ या पाच शाळांमध्ये हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमावेळी माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, सोमनाथ माळशेट्टी, निर्मला नागठाण, प्रवीण शहा, माणिक साळुंखे, माधुरी हर्डीकर, विजय चव्हाण, अंजू शहा, वर्षा सातवेकर, कृष्णाजी कुलकर्णी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, यातील अनेक माजी विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदांवर काम करत आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत. मात्र, त्यांची गावासाठीची ओढ कायम असून, हीच ओढ त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामागे प्रेरणा ठरली.
या सर्वांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर ही कल्पना मांडली. सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या वर्षी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि
यंदाही तो पुढे नेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची गरज ओळखून, थेट शाळेत जाऊन गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शालेय जीवनात आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी त्यांना दर्जेदार वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष धोंगडे म्हणाले,अशा प्रकारच्या उपक्रमांची खरी गरज शाळांना आहे. समाजातील सुशिक्षितांनी पुढाकार घेतल्यास, शिक्षण हा खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा मूलभूत घटक ठरू शकतो. यात माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा भाव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. जुन्या आठवणींना सामाजिकतेची जोड देणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे.