सोलापूर : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दौरे करीत असतांना आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी थेट भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिंदे म्हणाले कि, राज्यात आमची सत्ता आली तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे आपल्याला मान्य नाही. आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे. श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये.
ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत कसे बसेल? हे सरकारला ठरवायचे आहे. पण कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नये यासाठी स्वतंत्र कायदा करावा. लाभार्थ्यांनी गरजेपर्यंतच आरक्षणाचा उपयोग करावा आणि नंतर ते सोडून द्यावे. आर्थिक क्षमता असणाऱ्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.