ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत ; मंत्री पाटील

जळगाव : वृत्तसंस्था

राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दि.९ दिली. ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एका कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना बोलत होते.

विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे होते, तर प्र-कुलगुरू प्रा. एस. पी. इंगळे यांचीही उपस्थिती होती.

जामनेर तालुक्यातील एका विद्याथ्यांने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळण्याची मागणी केली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली. परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींच्या शुल्क माफीविषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!