ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपासून आधार लिंक नसलेल्यांना IRCTC वर तिकीट बुकिंगला मर्यादा

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून, ५ जानेवारीपासून आधारशी लिंक नसलेल्या IRCTC वापरकर्त्यांना सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन आरक्षित रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. हा नियम आरक्षित तिकीट बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच लागू राहणार असून, आरक्षित तिकिटांची बुकिंग ट्रेन सुटण्याच्या तारखेच्या ६० दिवस आधी सुरू होते.

रेल्वे प्रशासनाने हा नियम तीन टप्प्यांत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा २९ डिसेंबरपासून लागू करण्यात आला होता. दुसरा टप्पा आज, ५ जानेवारीपासून सुरू झाला असून तिसरा आणि अंतिम टप्पा १२ जानेवारीपासून लागू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात, म्हणजेच २९ डिसेंबरपासून आधार लिंक नसलेल्या वापरकर्त्यांसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तिकीट बुकिंग बंद करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात आजपासून ही वेळ वाढवून सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तर १२ जानेवारीपासून सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत अशा वापरकर्त्यांना IRCTC वर तिकीट बुक करता येणार नाही.

या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त सामान्य प्रवाशांना ऑनलाइन तिकीट मिळण्याची संधी देणे, तसेच बनावट खाती, दलाल आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर बुकिंगवर आळा घालणे. यामुळे ओपनिंग डे ला सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे सोपे होणार आहे. सुरुवातीच्या चार तासांत एजंटनाही तिकीट बुकिंग करता येणार नाही.

IRCTC खात्याला आधारशी लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट कन्फर्म होईल. आधार लिंक नसलेले वापरकर्ते बुकिंग विंडो उघडल्यानंतर सुरुवातीच्या चार तासांत तिकीट बुक करू शकणार नाहीत. सध्या यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. काउंटरवर तिकीट घेतानाही OTP आवश्यक असून, मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. इतर व्यक्तीसाठी तिकीट बुक करताना त्या व्यक्तीचा आधार आणि OTP देखील आवश्यक असेल.

आधार लिंक करण्यासाठी प्रवाशांनी IRCTC ॲप किंवा वेबसाइटवर लॉग-इन करून ‘My Profile’ मधील ‘Aadhaar KYC’ या पर्यायातून तपशील अद्ययावत करावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिकीट बुकिंग किंवा OTP संदर्भातील अडचणींसाठी IRCTC हेल्पलाईन क्रमांक 139 वर, तर आधारविषयक समस्यांसाठी UIDAI च्या 1947 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच जवळच्या रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरूनही प्रवाशांना मदत मिळू शकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!