पुणे : वृत्तसंस्था
“काही पुरस्कार व्यक्तीच्या प्रतिष्ठेत भर घालतात, आणि हा पुरस्कार मला मिळाल्याने तीच भावना माझ्याही मनात आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त केलं. राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुण्यात टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक उपस्थित होते.
आपल्या खास शैलीत बोलताना गडकरी म्हणाले, “माझ्या मंत्रालयाकडे प्रचंड निधी उपलब्ध आहे, पण तो खर्च करायला सक्षम माणसंच नाहीत, ही खंत आहे.” त्यांनी यावेळी पुणे ते मुंबई अंतर दीड तासात पार करणाऱ्या प्रस्तावित नवीन महामार्गाचाही उल्लेख केला. “देशात ना पैसा कमी आहे, ना तंत्रज्ञान – गरज आहे ती केवळ देशासाठी काम करणाऱ्या लोकांची,” असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.
गडकरींच्या स्पष्टवक्तेपणाचे विशेष कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात सत्य माहिती असूनही ती न बोलणे हे सामान्य आहे. मात्र, गडकरी हे त्याचे अपवाद आहेत. ते नेहमीच मनातले स्पष्ट बोलतात – त्यातून काहीही नुकसान झालं तरी.” फडणवीस पुढे म्हणाले, “गडकरी आणि अजित पवार कुठेही नवीन कामाचं निरीक्षण करताना चुका शोधतात आणि संबंधित अधिकाऱ्यांना सरळ खरडपट्टी काढतात. त्यांचं मानक एकच – कोणतंही काम दर्जेदार असावंच.”