अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट दिले.ऑक्सीजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे.ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन भेट दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर व तालुक्यात दैनंदीन कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.कोरोना रुग्णांना सेवा देत असतांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर ताण वाढला,आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेत भरच पडली होती. समाजसेवक विजयकुमार चव्हाण यांनी कोविड सेंटर मधील गरज लक्षात घेत त्यांचे चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने एक लाख रुपयाचे दोन ऑक्सिजन मशीन ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.अशोक राठोड यांच्याकडे सुपुर्द केले.
प्रति मिनिट पाच लिटर ऑक्सीजन निर्मितीची क्षमता असलेल्या ह्या मशीनमध्येच ऑक्सीजन तयार होतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोरोना रुग्णांना आणि रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळणार आहे.पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यावेळी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागु केले होते. गोरगरीब जनतेची उपासमार होत होती. अशा या वाईट प्रसंगी समाजसेवक विजय कुमार चव्हाण यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू व पाच किलो तांदूळ असे हजारो लोकांना त्यावेळी मदत केली होती.
दुसऱ्या लाटेत अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यांची दखल घेऊन कोरोना सेंटरला ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन भेट देऊन समाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड,सरपंच शिवलाल राठोड, वैद्यकीय अधीक्षक अशोक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करंजखेड,नगरसेवक बंटी राठोड, महेश हिंडोळे,यशवंत धोंगडे, के व्ही राठोड सर,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
★ सामाजिक बांधिलकी जपली
कोरोनाच्या माहामारीत अक्कलकोट शहर व तालुक्यात रुग्णाची संख्या वाढत असताना विजयकुमार चव्हाण यांनी ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन कोविड सेंटरला देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या योगदानामुळे रुग्णांना मदत मिळणार आहे- सचिन कल्याणशेट्टी,आमदार
★ चव्हाण यांचा योग्य निर्णय
कोविडचे रुग्ण संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.अशातच विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन मशीन कोविड सेंटरला भेट दिल्याने रुग्णाबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मदत नक्कीच मिळणार आहे – डॉ. अशोक राठोड,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट