अक्कलकोट, दि.३ : साखर कारखानदारी क्षेत्रातील अनेक संकटावर मात करत धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.हा दर देण्यास उशीर झाला परंतु तो पूर्णपणे शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.सध्या कारखानदारी क्षेत्र विविध अडचणींमधून जात आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा ऊस घेऊन अनेक दिवस झाले होते. परंतु त्यांना उच्चांकी दर देण्यास आम्ही कटिबद्ध होतो. भले उशीर झाला असेल परंतु २०२०-२१ यावर्षी २ हजार १११ रुपये दर जाहीर केला होता.त्याप्रमाणे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात बिल जमा होण्यास सुरुवात झाले आहे.मंगळवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये तसेच येत्या ऑक्टोबर महिन्यात हा कारखाना पुन्हा पूर्ण क्षमतेने गाळप हंगामासाठी सज्ज आहे.ज्या पद्धतीने मागच्या काळात ऊस देऊन कारखान्याला सहकार्य केले आहे.त्याच पद्धतीने या गळीत हंगामात देखील कारखाना व्यवस्थापनाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण मोठे होते .यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाला चांगला दर देण्यासाठी हा
कारखाना सदैव कटिबद्ध असून कधीही शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.शेतकऱ्यांनी देखील आत्तापर्यंत या कारखान्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे आणि या विश्वासावरतीच हा कारखाना उभा असून तोच विश्वास यापुढेही कायम राहावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्यंतरी थोड्याशा अडचणीमुळे बिल देण्यास विलंब झाला परंतु हे सर्व बिल देण्यास आम्ही कटिबद्ध राहिलो आणि यापुढे देखील आहोत ,असेही ते यावेळी म्हणाले.