गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची घेतली भेट,भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा
अक्कलकोट, दि.२३ : धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून एक महिन्याच्या आतच त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. बुधवारी,मुंबईत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ३० नोव्हेंबरनंतर पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केली जाईल.त्यानंतर मुंबईत अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होईल,अशी माहिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती.या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांनी उस्मानाबाद येथे पवार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री अचानक थेट पवार यांचा शिंदे यांना फोन आल्याने ते बुधवारी मुंबई भेटीस गेले होते. या बैठकीत अक्कलकोट तालुक्याच्या आगामी राजकारणावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे कळते. या भेटीदरम्यान अक्कलकोटमधील प्रलंबित एकरूख उपसा सिंचन योजना, बस स्टॅन्ड, कारखाने, ग्रामीण भागातील रस्ते, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, भाविकांना मिळणाऱ्या सुविधा, जिल्हा परिषद मतदार संघ निहाय समस्या सोडवण्यासाठी शिंदे यांनी पवार यांना निवेदन दिले. नंतर पवार यांनी शिंदे यांना कामाला लागण्याची सूचना केली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोकस केले आहे.
या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मतदार संघातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शिंदे यांना निमंत्रित केले होते. या बैठकीनंतर शिंदे यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याचे समजते. शिंदे हे सध्या गोकुळ शुगरचे अध्यक्ष आहेत. अनेक वर्ष त्यांचे घराणे राजकारणात आहे. साखर उद्योगात त्यांचे नाव आहे. दहिटणे (तालुका अक्कलकोट) हे त्यांचे मूळ गाव असून ते जेष्ठ नेते बलभीम भाऊ शिंदे यांचे चिरंजीव आहेत.
मुंबईतील भेटीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, सर्व कार्यक्रम ठरलेला आहे. लवकरच आम्ही तारीख जाहीर करू आणि कामाला लागू. यानिमित्त अक्कलकोटमध्ये भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील,अमोल व्हटकर उपस्थित होते.