मुंबई : वृत्तसंस्था
देशातील सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज (6 नोव्हेंबर) राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,11,490 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे. चांदीच्या दरातही घट होत असून, देशभरातील सराफा बाजारांमध्ये भाव कमी झाले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोनं ₹1,11,340 प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोनं ₹1,21,470 प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. पुणे आणि बेंगळुरूमध्येही दर जवळपास समानच असून, या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं ₹1,21,470 आणि 22 कॅरेट सोनं ₹1,11,340 प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचा भाव 4,900 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तर ANZ बँकेनुसार 2025 च्या मध्यापर्यंत तो 4,600 डॉलर दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
सोन्यासोबतच चांदीही स्वस्त झाली असून, आज चांदीचा भाव ₹1,50,400 प्रति किलो इतका झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा आक्रमक आर्थिक दृष्टिकोन, डॉलर इंडेक्समधील वाढ आणि व्याजदरातील हालचाल ही घसरणीची प्रमुख कारणं आहेत.