मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून आता पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतली आहे. दिवाळीपूर्वी सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर काहीशी घसरण झाली. मात्र डिसेंबरमध्ये सोन्या-चांदीने पुन्हा तेजीत झेप घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2025 या वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 73 ते 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 78 हजार रुपये होता. अवघ्या काही महिन्यांतच हा दर थेट 1 लाख 37 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 46 वर्षांच्या इतिहासात सोन्याच्या किमतीत इतकी मोठी वाढ पहिल्यांदाच नोंदवली गेली असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
एमसीएक्स (MCX) वरही सोन्याने नवा उच्चांक गाठला असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,35,590 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव सुमारे 1,34,200 रुपयांच्या आसपास होता. ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 139 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोने अजूनही गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे. मात्र एवढ्या मोठ्या वाढीनंतर आता सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करावी की नफा वसूल करून थांबावे, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. सोन्याच्या या ऐतिहासिक तेजीत पुढील काळात काय घडणार, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे.