मुंबई वृत्तसंस्था : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी गुंतवणूकदारांसह सामान्य ग्राहकांनाही धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज, 5 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या भावात अचानक मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे.
सुनर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल 1,600 रुपयांची, तर चांदीच्या दरात 4,000 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे सोन्याने थेट शिखर गाठले असून चांदीही उच्चांकाच्या दिशेने झेपावत आहे.
नव्या दरांनुसार, जळगाव सराफा बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 39 हजार 668 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह तब्बल 2 लाख 47 हजार 200 रुपये प्रति किलो झाला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली असून गुंतवणूकदार मात्र उत्साही दिसत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, नव्या वर्षात सोन्याचा भाव दीड लाख रुपयांच्या तर चांदीचा भाव अडीच लाख रुपयांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, चलनवाढ, जागतिक आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणुकीचा वाढता कल यामुळे मौल्यवान धातूंचे दर आणखी वाढू शकतात.