मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सणासुदीच्या काळात ही दरवाढ सर्वसामान्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. वाढत्या भावांमुळे आता सोनं मकर संक्रांतीपूर्वीच दीड लाखांच्या जवळ पोहोचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी, 10 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.
10 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 100 ग्रॅम तब्बल 24,600 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. एका ग्रॅममागे हा दर 2,460 रुपयांनी वाढला आहे. बाजारातील अंदाजानुसार लवकरच सोन्याचे दर 25,000 ते 1,42,000 रुपये, तर चांदीचे दर 2,32,000 ते 2,55,000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,150 रुपयांनी वाढून थेट 1,40,460 रुपयांवर पोहोचला. तसेच 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,500 रुपयांनी वाढून 14,04,600 रुपये झाला आहे. एका ग्रॅमचा दर 14,046 रुपये इतका झाला आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,28,750 रुपये, तर 100 ग्रॅमचा दर 12,87,500 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 आणि 100 ग्रॅमच्या दरात अनुक्रमे 1,050 रुपये आणि 10,500 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
सोन्यासोबतच चांदीनेही मोठी झेप घेतली आहे. 10 जानेवारी रोजी एक किलो चांदीचा दर थेट 2.60 लाख रुपयांवर पोहोचला असून, चांदीच्या भावात एकाच दिवसात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. याच कारणामुळे मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काळातही सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, सामान्य ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष आता बाजाराच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.