नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे नागपूरमध्ये निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. शुभांगी भडभडे यांचा जन्म 21 डिसेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांनी चरित्रात्मक कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटक, एकांकिका, प्रवासवर्णन, ललित लेखसंग्रह, बालसाहित्य असे विपुल लेखन केले. वयाची 80 पूर्ण झाल्यानंतरही त्यांचे लेखन सुरू होते.
शुभांगी भडभडे या साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वी केले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केलाय.
शुभांगी भडभडे यांनी तब्बल 22 सामाजिक आणि 23 चरित्रात्मक कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांच्या 18 कादंबऱ्या हिंदीत प्रकाशित झाल्यात. त्यांची आठ महानाटकेही हिंदी प्रकाशित झाली. त्यांच्या कादंबऱ्या आणि कथा, नाटके मराठीसोबतच हिंदीमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार, सारथी साहित्य ॲवार्ड, महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, साहित्य अकादमी बडोदेचा कथा पुरस्कार, सुमन देशपांडे बाल साहित्य पुरस्कार, पंजाब सरकारचा पुरस्कार, कोलकात्याचा प्रज्ञा पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. त्यांची नाटके अंदमान ते लेह लडाख, दार्जिलिंग ते द्वारका , हिमाचल ते गोवा, दुबई आणि अमेरिकेत झाली. राष्टीय चरित्र कादंबरीकार उपाधीनेही त्यांचा गौरव झालाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शुभांगी भडभडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ‘सुप्रसिद्ध लेखिका, ज्येष्ठ कादंबरीकार आणि पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यसाधक शुभांगीताई भडभडे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. 80 हून अधिक कादंबऱ्या लिहिताना त्यांनी चरित्रलेखनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवारजी, प. पू. गोळवलकर गुरुजी, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावरही त्यांनी चरित्रलेखन केले होते. त्यांच्या निधनाने एक प्रतिभावंत साहित्यिक आपण गमावला आहे आणि साहित्य क्षेत्राने एक ज्येष्ठ मार्गदर्शक! ‘मृत्युंजयाचा महायज्ञ’ ही कादंबरी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिली, तेव्हा त्याला ‘ऑडियो बुक’मध्ये रूपांतरित करण्याची विनंती मी त्यांना केली होती आणि त्यांनी त्याला सहर्ष होकार दिला आणि ते काम पूर्ण झाले. अनेक पुस्तकांना त्यांनी हक्काने माझ्याकडून प्रस्तावना घेतल्या. त्यामुळे सातत्याने त्यांच्याशी संवाद व्हायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती.’