धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देवीचे वार व सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी घेतला आहे. सोबतच स्थानिक भाविकांसाठी ही तीन दिवस एक तास वेळ दर्शनासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
देवीच्या दर्शनासाठी वरचेवर वाढत चाललेली गर्दी लक्षात घेऊन मंदिर अधिक वेळ खुले ठेवण्याची मागणी पुजारी मंडळ तसेच स्थानिक नागरिकांतून केली जात होती. याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सोमवार, बुधवार व गुरुवारी पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत स्थानिक भाविकांना आधारकार्ड दाखवून दर्शन घेता येणार आहे. ही वेळ स्थानिकांसाठी राखीव असणार आहे.
मंगळवार व शुक्रवार हे देवीचे वार असल्याने व रविवार सुटीचा दिवस असल्याने यादिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी उपरोक्त तिन्ही दिवशी केवळ दोन तास मंदिर बंद ठेवण्यात येईल. मध्यरात्री एक वाजल्यापासून दर्शन सुरु होणार असून रात्री ११ वाजता बंद केले जाईल.