ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : “एमबीबीएस प्रवेशात ‘इतक्या’ जागा वाढ !

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा करत देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशाच्या संधी वाढल्या असल्या, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा थेट लाभ कितपत होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या ३५० नव्या जागांपैकी तब्बल ३०० जागा डीम्ड युनिव्हर्सिटीकडे गेल्या आहेत. या संस्था खासगी असल्यामुळे त्यांचे शिकवणी शुल्क अत्यंत जास्त आहे, जे अनेक पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. उरलेल्या ५० जागा अंधेरीतील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयात मंजूर झाल्या असल्या, तरी त्यातील फक्त ८ जागाच ऑल इंडिया कोटामध्ये (AIQ) येणार असून उर्वरित जागा ईएसआयसी कार्डधारकांसाठीच मर्यादित आहेत. यामुळे पालक संघटनांनी नाराजी व्यक्त करत, ही वाढ राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी “केवळ आकड्यांची वाढ” असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ५ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीचा (Round 2) प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. या फेरीत नव्याने जोडलेल्या जागांचा समावेश असणार असून, काही विद्यार्थ्यांना अपग्रेड किंवा नवीन पर्यायांची संधी मिळू शकते.

तमिळनाडूतील तीन डीम्ड युनिव्हर्सिटींना प्रत्येकी ५० अशा १५० जागा, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान व तेलंगणा येथील नवीन सरकारी महाविद्यालयांनाही NMC ने मान्यता दिली आहे. याशिवाय देशातील काही विद्यमान महाविद्यालयांमध्येही अतिरिक्त जागांची भर पडली आहे.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा वाढवण्याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र राज्य कोट्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी नवीन जागांची अधिकृत घोषणा होईल, अशी पालकांची आशा आहे. एकूणच, वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांवर झुलणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही जागांची वाढ आशेचा किरण आहे; पण तो किती जणांपर्यंत पोहोचतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!