भंडारा : प्रतिनिधी
राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून पुढील शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भंडारा येथे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
भंडारा येथे आयोजित आपत्कालीन अभ्यासक्रम अंमलबजावणी तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बदलत्या रोजगार बाजाराच्या गरजा लक्षात घेता केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून संवाद कौशल्य, व्यवस्थापन, विपणन, आर्थिक व्यवहारांची समज आणि व्यक्तिमत्त्व विकास या बाबी तितक्याच आवश्यक असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर राज्यात चार महिन्यांचे चार वेगवेगळे शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांत पहिल्या महिन्यात व्यक्तिमत्त्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट), दुसऱ्या महिन्यात मार्केटिंग व फायनान्स, तिसऱ्या महिन्यात मॅनेजमेंट, तर चौथ्या महिन्यात स्थानिक प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांची कार्यपद्धती यांचा समावेश असेल. या चारही विषयांचा थेट रोजगाराशी संबंध असल्याने तरुणांना प्रत्यक्ष कामाच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.
हे शॉर्ट टर्म कोर्सेस राज्यभरातील विविध ठिकाणी राबवले जाणार असून पुढील शैक्षणिक सत्रापासून शासकीय आयटीआय संस्थांमध्येही हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी आयटीआयबाहेरील असतील, तसेच ५० टक्के शिक्षकही नॉन-आयटीआय पार्श्वभूमीचे असतील, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
विविध क्षेत्रातील अनुभव, दृष्टिकोन आणि कौशल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी ही मिश्र पद्धत राबवली जाणार असून त्यामुळे अभ्यासक्रम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.