अक्कलकोट : कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व मंदिरे आजतागायत बंद असल्याने मंदिर परिसरातील पुजेचे साहित्य विक्री करणाऱ्या छोटे व्यावसायिक दुकानदार तसेच हॉटेल, लॉज ईत्यादी याच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी सरकारने त्वरीत मंदिर उघडे करुन सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी ईमेलद्वारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
एकीकडे दारुची दुकाने, शॉपिंग मॉल, बाजार पेठ सर्व काही चालू आहेत. सध्या खरेदी करण्यासाठी एकच गर्दी वाढलेली दिसून येत आहे. कोरोना फक्त मंदिर उघडे केल्यावर वाढते का याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. एकीकडे राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त झालेले असताना सरकारने मंदिर उघडण्यात काय अडचण आहे तेच कळत नाही.
गेल्या दिड वर्षांपासून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असताना सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरी शासनाने त्वरित यावरती उपाय योजना करुन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मंदिरासमोर अनोखे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांनी केले आहे.