नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत सभा घेत आहे, तर सरकारने दिलेली तारीख सुद्धा जवळ आली असल्याने यावर कुठलाही निर्णय होत नसल्याने आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहे.
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, ”अधिवेशनात सरकारने ‘तारीख पे तारीख’ दिली पण आरक्षण काही दिले नाही. आता फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनाची घोषणा केली. मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला लॉलीपॉप देण्याचा नवीन प्रयत्न सरकारने केला आहे”, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच आता श्रद्धा सबुरी म्हणत आहेत मग तुम्ही कमिटमेंट का दिली. आता सरकारने दिलेला शब्द पाळावा असे विधानही वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, ”आता सत्ता त्यांच्या हातातून गेली आहे. त्यांच्या हातात सत्ता देण्याची जनतेची मानसिकता राहिली नाही. त्यामुळे काँग्रेसला बदनाम करण्याचे काम अजित पवार करतात” असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच ‘दिल्या घरी तुम्ही सुखी राहा’ असे म्हणत वडेट्टीवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.