ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विरोधक गायब… युतीतच संघर्ष? जयकुमार गोरे यांचा बापूंवर गंभीर आरोप

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर जिल्ह्यात देखील महायुतीमध्ये लढत होत असल्याचे दिसत आहे. स्थानिक राजकारण तापले असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील संबंधांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सांगोला शहरात होत असलेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी येणार असल्याच्या चर्चेत त्यांनी म्हटले की, ते आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. ते त्यांच्या पक्षासाठी मतं मागतील, आम्ही आमच्या पक्षासाठी मतं मागू. जिथे युतीने एकत्र उमेदवार उभे केले आहेत, तिथे नक्कीच आम्ही एकत्रितपणे मतांची विनंती करू.

यामुळे स्थानिक पातळीवर असलेल्या राजकीय ताणतणावांनंतरही महायुतीतील दोन्ही पक्षांनी कमीतकमी औपचारिक पातळीवरील सुसंवाद कायम असल्याचं चित्र दिसून आलं आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी स्वतः शिंदेंची सभा आयोजित केल्याने या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

पंढरपूर येथे संत नामदेव पायरीवर निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी सांगोला तालुक्यातील परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करत म्हटलं की, मी पालकमंत्री झाल्यापासून बापूंनी एकदाही युतीसंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही. एकदा भेट झाली तेव्हा त्यांनी सांगोला येथे मैत्रीपूर्ण लढत करू अशी भावना व्यक्त केली होती. पण त्यानंतर कोणत्याही चर्चेला ते पुढे आले नाहीत. तरीही स्वतः आणि बापू यांच्यात वैयक्तिक नातेसंबंध चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले. बापू आमचे सहकारीच आहेत; स्थानिक परिस्थितीमुळे ते व्यथित झाले असतील पण निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा एकत्र असू, असे स्पष्ट करून त्यांनी वादाच्या चर्चांना सौम्य वळण दिलं.

राज्यातील एकूण राजकीय स्थितीवर भाष्य करताना गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं की, आज शरद पवारांचा पक्ष दिसत नाही, मशाल कोठेच दिसत नाही, पंजा गायब आहे. अशावेळी आमच्या आमच्यातच लढायची वेळ येते. विरोधकच नसले तर आम्ही आपल्यातच लढून घेऊ. त्यांच्या या वक्तव्याने सांगोला तसेच जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवे रंग भरले असून, महायुतीतील आंतरिक स्पर्धा आणि विरोधकांच्या कमकुवत स्थितीचे चित्र त्यांनी विनोदी शैलीत मांडले. महायुतीतील स्थानिक पातळीवरील संघर्ष जरी सुरू असले तरी राजकीय समीकरणांचे वजन सध्या भाजप-शिंदे यांच्यातच असल्याचा सूचक संकेत त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!