कल्याण : वृत्तसंस्था
केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली म्हणून आधी संजय राऊत, मग झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले. या सर्व घटनांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे संसदीय लोकशाही नेस्तनाबूत करून देशाला हुकूमशाहीकडे घेऊन चालले आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. स्वातंत्र्यप्राप्तीपासून नेहरू-गांधी कुटुंबाने देशासाठी दिलेले योगदान कोणी विसरू शकत नाही, असेही पवार म्हणाले.
भिवंडी लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ कल्याणच्या यशवंतराव चव्हाण मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अॅड. असीम सरोदे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली १० वर्षे मोदींच्या हातात सत्ता आहे. तरीही आज देशाची परिस्थिती काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. महागाई, बेरोजगारी या प्रश्नांबरोबरच देशाच्या सीमाही सुरक्षित नाहीत. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर रस्ते बांधून चीनने अतिक्रमण सुरू केले आहे. मात्र त्याकडे मोदींचे लक्ष नाही. ते राज्यात फक्त सभेला येतात आणि शहजादे बोलून राहुल गांधींवर टीका करतात. स्वातंत्र्यप्राप्तीपासून नेहरू-गांधी कुटुंबाने देशासाठी दिलेले योगदान कोणी विसरू शकत नाही. मात्र मोदी त्यांचा सन्मान करण्याऐवजी केवळ टिंगलटवाळी करतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.
नरेंद्र मोदी देशाला हुकूमशाहीकडे घेऊन चालले असून देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच देशातील श्रीमंत उद्योगांचा फायदा करून देण्यासाठी बँकांनी मोठमोठ्या कंपन्या स्वस्तात उद्योगपतींना विकल्या. त्यामुळे बँकांमध्ये मोठा खड्डा असून दरवर्षी ६३ हजार कोटी रुपये भारतीयांच्या खात्यातून काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.