सोलापूर, दि.3: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमाचे पालन करावे, कोरोनाला सर्वांच्या सहकाऱ्याने हरवूया, असे विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे व्यक्त केला .
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे , अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या कमी होत आहे, म्हणून कोणीही गाफील राहू नये. जिल्ह्यातील पाच तालुक्यात कडक संचारबंदी आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रूग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. होम आयसोलेशन कमी केल्यानेही रूग्णसंख्या आटोक्यात राहिली आहे. पॉजिटिव्ह दर दोन टक्के झाला आहे. सोलापूर शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यात कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा दोन नंबरवर आला आहे. प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेने लस मिळाली की ती नागरिकांना दिली. यामुळे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. दोनवेळा 80 हजार लस मिळाली आहे, अशीच लस मिळाली तर दीड महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आशावाद श्री. भरणे यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा पहिला डोस 29 टक्के तर दुसरा डोस 11.03 टक्के नागरिकांना दिला आहे. 40 टक्के नागरिकांना डोस दिल्याची माहिती लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी दिली.
★ अपंगांच्या दाखल्यासाठी शिबीर घ्या
जिल्ह्यातील अपंग व्यक्तीला लाभासाठी दाखल्यांची गरज आहे. सिव्हील हॉस्पिटलने शिबीर घेऊन दाखले मिळवून देण्याची सूचनाही श्री. भरणे यांनी केली.
★ संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सज्जता
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. लाटेची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाच तालुक्यात संचारबंदी लागू केल्याचा फायदा झाला. पाच तालुक्यात चारवाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली आहेत. ऑक्सिजनची तीनपट क्षमता वाढविल्याने कमतरता नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
★ एका दिवसात 19 हजार महिलांचे लसीकरण
जिल्ह्यात रक्षाबंधनादिवशी केवळ महिलांसाठी कोरोना लसीकरण आयोजित केले होते. एका दिवसात 19 हजार 510 महिलांना लसीकरण केले. आता शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली.
सध्या 3011 रूग्ण ग्रामीण भागात तर 35 सोलापूर शहरात असे 3046 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. आयसोलेशन बेड 23 हजार 658 तर ऑक्सिजन 4819 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत पहिल्या लाटेत 1844 आणि दुसऱ्या लाटेत 2995 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.
ऑक्सिजनचे सातपैकी चार प्रकल्प सुरू झाले असून पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस येथील प्रकल्प येत्या आठवड्यात सुरू होतील. 10 साठवण टँकही 10 सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार गोविंदराव, कोविड समन्वयक भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.