ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रचाराला बंदुकीचा धाक! उमेदवारावर थेट बंदूक रोखल्याने खळबळ

नाशिक वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण तापले असतानाच सातपूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक रोखण्यात आली. इतकंच नव्हे तर “इथे प्रचाराला फिरायचं नाही,” अशी उघड धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.

समाधान आहेर हे आपल्या कार्यकर्त्यांसह सातपूर भागात प्रचार करत असताना एका तरुणाने अचानक समोर येत बंदूक काढली आणि प्रचार थांबवण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेबाबत आम आदमी पक्षाने दावा केला आहे की, बंदूक रोखणारा तरुण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता आहे. विशेष म्हणजे प्रकाश लोंढे सध्या तुरुंगात असून तिथूनच ते निवडणूक लढवत असल्याचा दावाही ‘आप’कडून करण्यात आला आहे. या आरोपांमुळे नाशिकच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ‘आप’च्या एका कार्यकर्त्याने मोबाइलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

१५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून, त्याआधीच अशा धमकीच्या घटना समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना पैसे वाटणे, उमेदवारांना व कार्यकर्त्यांना धमकावणे अशा घटनांमुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!