वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची अनुपस्थिती
अक्कलकोट – गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो स्वामीभक्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या चरणी नतमस्तक होत असतात. कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे दिनांक २५ मार्च २०२१ रोजी येथील वटवृक्ष मंदिर स्वामी भक्तांच्या दर्शनाकरीता पुन्हा एकदा बंद करण्यात आले.
यथावकाश कोरोनाची दुसरी लाट ओसरली परंतू मंदीरआज पर्यंत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा हे नियमितपणे चालू आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. या पाश्र्वभुमीवर दिनांक २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आली आहे. प्रशासकीय आदेशानुसार पुढील काही दिवस अथवा महिने मंदीर बंदच राहणार आहे, त्यामुळे वटवृक्ष मंदिरातील श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. त्यामुळे यंदा गुरूपौर्णिमेरोजी लाखो स्वामी भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे प्रति गुरूपौर्णिमेरोजी स्वामी भक्तांनी गजबजलेला मंदीर परिसर यंदाही ओस दिसणार आहे. वटवृक्ष मंदिरातील यंदाही धार्मिक कार्यक्रमामध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत.
गुरूपौर्णिमेजी पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात व मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता स्वामींची महानैवेद्य आरती संपन्न होईल.
याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात येईल. यावेळी कोणत्याही भाविकांचा सहभाग असणार नाही. लॉकडाऊनमुळे आरतीनंतर मंदीर बंदच राहणार आहे. तरी यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सवही भाविकांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करून साजरी करावी असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.