ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदे गटाचे निम्मे खासदार ठाकरेंच्या संपर्कात ; वडेट्टीवार

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

ते म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 7 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला असून शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या विशेषतः शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केल्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचाही संकल्प व्यक्त केला. सद्यस्थितीत शिवसेनेचा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गोंधळलेल्या स्थितीत आहे. भाजपचीही मोठी दमछाक सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न निश्चितच धुळीस मिळवेल, असे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड पोषक परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर जनता काँग्रेसला आपला कौल देईल. विद्यमान सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग व चीड आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम होऊ अशी भीती लोकांना वाटत आहे. परिणामी, लोकांनीच आता भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा निश्चय केला आहे. गडचिरोली लोकसभा मतदार संघ काँग्रेस जिंकेल. या ठिकाणी भाजपला दुसरा पर्याय मिळाला नसल्यामुळे काँग्रेसचे किरसान सहज निवडून येतील, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!