नाशिक : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली असतांना अनेक पक्षात नाराज असलेले नेते आता पक्ष बदलाच्या भूमिका घेत असतांना माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारले असता, नीलेश राणे शिवसेनेत येत असतील तर दु:ख वाटण्याचे काहीही कारण नाही. उलट आनंद असून, सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावण्याची जबाबदारी माझी असेल असे, स्पष्ट केले आहे.
उद्योग विभागातर्फे आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमानंतर नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते. तिकीट वाटपाबाबतचे सर्वस्वी अधिकार शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना आहेत. त्यामुळे कोणास तिकीट द्यावे, हे तेच ठरविणार आहेत. तसेच नीलेश राणे यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य असेल, तर सहकारी म्हणून त्यांना ताकद देण्याची माझी जबाबदारी आहे. त्यांना तिकीट दिल्यास मला दु:ख वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागा वाटपाबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत राणे विरुद्ध सामंत असा काहीसा वाद रंगला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.