रामनवमी दिवशी सुखद घटना : सुपारी फोडायला आले अन लग्न लावले !
मोट्याळमध्ये सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमातच उरकले लग्न ; पाटील कुटुंबाचा आदर्श
अक्कलकोट : मारुती बावडे
श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमात लग्न उरकल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथे घडली आहे. उन्हाचे वाढते प्रमाण आणि अनाठाही खर्च टाळून दोन कुटुंबाच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याने परिसरात या विवाहाची चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे मोट्याळ गावचे सरपंच कार्तिक पाटील यांनीच स्वतः पुढाकार घेतल्याने या विवाह सोहळ्यातून चांगला संदेश समाजासमोर गेला आहे.
सरपंच पाटील यांचे बंधू आप्पासाहेब बळीराम पाटील यांचे चिरंजीव सचिन आणि दत्तात्रय देविदास शिंदे यांच्या कन्या अंकिता यांचा विवाह सोहळा बुधवारी गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पार पडला.साधारण दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गावामध्ये सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान अचानक दोन कुटुंबांमध्ये विवाह उरकून घेण्यासंदर्भात चर्चा झाली आणि अवघ्या तीन तासामध्येच विवाह उरकल्याची घटना घडली.यात गावातील ज्येष्ठ मंडळीचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या सर्व प्रस्तावावर हरी सुरवसे,दिनकर काळे,मेजर नटूलाल शेख, सत्यवान पाटील,अनिल इनामदार, आप्पाराव साळुंखे, शिवाजी सुरवसे,तंटामुक्त अध्यक्ष व्यंकटराव पाटील, दिगंबर इनामदार, रऊफ मुल्ला ,गोविंद सुरवसे ,प्रताप सुरवसे, नागनाथ मोरे यांनी चर्चा करून निर्णय घेतला आणि दोन्ही कुटुंबाला पाठिंबा दर्शवत चांगला निर्णय घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे या सोहळ्या दिवशी रामनवमी होती.एक चांगला दिवस होता.त्यामुळे दोघा कुटुंबाने हा निर्णय तातडीने घेतला,असे सरपंच कार्तिक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापूर्वी अनेक वेळा सुपारी फोडून साखरपुड्याच्या कार्यक्रमात लग्न उरकल्याच्या घटना घडलेल्या आहेत.काही वेळा लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करून मोठ्या थाटामाटामध्ये लग्न करण्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न हे धुमधडाक्यात व्हावे असे वाटते परंतु क्वचितच असे कुटुंब आहेत. ज्यांनी या सगळ्या गोष्टीला फाटा देत स्वतःची आर्थिक बचत करत समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.यासाठी गावातील जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन लाभले,असे पाटील यांनी सांगितले.