ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हार्दिक, विराटचा मोठा विजय ; १७ वर्षानंतर आनंदाची पर्वणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

निर्णायक लढतीत विराट कोहलीने झळकावलेले संयमी अर्धशतक (७६ धावा, ५९ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) आणि जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग व अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (प्रत्येकी २ बळी) प्रभावी माऱ्यामुळे भारतीय संघाने ट्वेण्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने विजयासाठी दिलेले १७७ धावांचे आव्हान सर करताना पहिल्यांदा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारता आली… आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १७ वर्षांनंतर ट्वेण्टी-२० विश्वचषकाचा दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. याच बरोबर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) स्पर्धातील आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात डळमळती झाली. कारण फिरकीपटू केशव महाराजने डावाच्या दुसऱ्याच षटकात भारताला दुहेरी धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा (९ धावा, २ चौकार) महाराजला स्विप मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक हेनरिच क्लासेनकडे झेल देत परतला. डावखुऱ्या त्रऋषभ पंतलाही (०) स्विपचा मोह आवरता आला नाही आणि तो महाराजचा दुसरा शिकार ठरला. सूर्यकुमार यादवने (३ धावा) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला टोलावण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ क्लासेनकडे झेल दिला. ३ बाद ३४ नंतर धावगतीला वेग देण्यासाठी अष्टपैलू अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. विराट कोहलीने त्याला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. फिरकीपटू तबरेज शम्सीने धावगतीला लगाम घातला. मात्र अक्षरने टीम इंडियाचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवत धावगतीत सुधारणा केली. भारताच्या शंभर धावा १४ व्या षटकात फलकावर लागल्या. अक्षर दुर्दैवी ठरला आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने त्याला धावचित केले. ३१ चेंडूंत ४ षटकार व १ चौकाराने त्याने ४७ धावा काढताना कोहलीसोबत चौथ्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी रचली. कोहलीने ४८ व्या चेंडूवर एकेरी धाव घेत यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर कोहलीने आपल्या खेळीला वेगवान स्वरूप दिले.

मार्को जेन्सनला सलग दुसरा षटकार लगावण्याच्या प्रयत्नात कोहली सीमारेषेजवळ रबाडाकडे झेल देत परतला. कोहली व दुबे या जोडीने पाचव्या गड्यासाठी ५७ धावा जोडल्या. शिवम दुबे १६ चेंडूंत २७ धावांची (३ चौकार, १ षटकार) भर घालून परतला. रवींद्र जडेजा (२) बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. भारताची ७ बाद १७६ ही विश्वचषक इतिहासात अंतिम फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

बुमराहच्या आतमध्ये येणाऱ्या चेंडूने रिझा हेंडरिक्सचा (४) बचाव भेदला. अर्शदीप सिंगने दुसऱ्या बाजूने कर्णधार एडन मार्करामला (४) यष्टिरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सने त्यानंतर धावगती कायम राखली. फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या अक्षरने खेळपट्टीवर तग धरलेल्या स्टब्सच्या (३१ धावा, ३ चौकार, १ षटकार) यष्ट्या वाकवल्या. अखेरीस अर्शदीप सिंग मदतीला धावून आला आणि क्विंटन (३९ चेंडू, ३१ धावा, ४ चौकार, १ षटकार) चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ कुलदीपकडे झेल देत परतला. हेनरिच क्लासेनने कुलदीपच्या एका षटकात १४ आणि अक्षरच्या षटकात २४ धावांची लयलूट केली. बुमराहने त्यानंतर धोकादायक स्वरूप धारण करणारा क्लासेन (५२ धावा, २७ चेंडू, २ चौकार, ५ षटकार) व मार्को जेनसनचा (२) बळी घेत सामना रंगतदार वळवणार आणून ठेवला. अर्शदीपने १९व्या षटकात केवळ ४ धावा देत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. हार्दिकने अखेरच्या षटकात धोकादायक डेव्हिड मिलरचा (२१ धावा) बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!