अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरली होती. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हजरत पीर सातू सय्यद बाबा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या यात्रेत सर्व जाती धर्मांचे लोक दूरवरून एकत्र येतात ही परंपरा गेली अनेक वर्ष ग्रामस्थ जोपासत आहेत.
गुरुवारी पहिल्या दिवशी गंध लावण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गावातून चांदीच्या घोड्याची मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी दिवसभर नैवेद्य दाखवणे तसेच नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला. यात हजारो भाविकांनी हजरत पीर बाबांचे दर्शन मोठ्या भक्तीभावाने घेतले. सायंकाळी व्यंकट मोरे युवा मंच तर्फे लावण्यरंग कार्यक्रमाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, कार्तिक पाटील,सरपंच व्यंकट मोरे व अन्य मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी सकाळी आणि दुपारी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत मराठवाडा, कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यातील मल्ल सहभागी झाले होते. सायंकाळी अमरप्रेमी युवा मंच व राहुल काळे युवा मंच तर्फे दोन ठिकाणी लावण्यखणी व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, अमर पाटील, बाळासाहेब मोरे, राहुल काळे, सागर काळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यात्रा पंच कमिटीच्यावतीने भाविकांना सुविधा मिळण्यासाठी चांगले नियोजन करण्यात आले होते. या नियोजनाचे कौतुक भाविकांकडूनही झाले. शनिवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने या यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली.