छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
मुंबईला कसे जायचे आहे ते आम्ही तुम्हाला सर्वांना कळवणार आहोत. त्याप्रमाणे सर्वांनी हसत-खेळत मुंबईला पायी जायचे आहे. आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईला येणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या वाहनात सर्व सोयीसुविधा असाव्यात, अशा स्वरूपाचा बंदोबस्त करून यावे. कुठून कसे जायचे याबाबत लवकरच सर्वांना निरोप दिला जाईल. तसेच मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन हे अत्यंत शांततेत होणार आहे, अशा सूचना मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरू आहे. गावागावात सुरू असलेली ही साखळी उपोषणे थांबवा आणि २० जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी करा, असे आवाहनही त्यांनी मराठा तरुणांना केले आहे. मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी दुपारी एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सोमवारी सकाळी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, येत्या २० जानेवारी रोजी आपल्या सगळ्यांना मुंबईला जायचे आहे. आपल्याला कुणालाही घरी राहायचे नाही, घरी राहून तुम्ही काय करणार आहात. आपल्या लेकराच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण मिळणे हे गरजेचे आहे. त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी मुंबईला यायलाच पाहिजे. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कामे आटोपून घ्यावी आणि मुंबईला जाण्याची तयारी करावी, आतापर्यंत कधी झाला नाही, असा मराठा समाजाचा मुंबईतील आरक्षणाचा लढा असणार आहे. अंतरवाली सराटी सोडून राज्यातील सर्व साखळी उपोषण बंद करून मुंबईला जाण्याची सर्वांनी तयारी करावी, असेही जरांगे-पाटील म्हणाले,