मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असतांना दोन प्रमुख प्रक्षांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणी असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला होता.
मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले नाही असे म्हणत ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली.