सोलापूर : प्रतिनिधी
उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी बसविण्यात आलेले एसी, वृक्षांची होणारी बेसुमार तोड, खालावत चाललेली जमिनीतील पाणी पातळी या प्रमुख कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजकाल अगदीच आवश्यकता असेल तरच नागरिक दुपारच्या सुमारास घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे बहुतांशी रस्ते काही काळ ओस पडल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यापासून यंदा उन्हाने चाळीशी गाठली होती. शहरात शनिवारचे तापमान ४१.६ अंशावर स्थिरावल होते.
मागील वर्षी मार्च एप्रिल महिन्यात सकाळी थंडी आणि रात्री उकाडा असे चित्र होते. एप्रिलच्या अखेरपासून उन्हाचा कडाका वाढत चालला होता. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस होते. सध्या सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हवेत उकाडा जाणवत आहे. तापमानात सतत वाढ होत असून दिवसभरात सरासरी तापमान ४० ते ४१ अंशावर स्थिरावत आहे.
उन्हात गारवा मिळण्यासाठी चौकाचौकात नैसर्गिक पेय विक्रीसाठी उपलब्ध असून तेथेही नागरिकांची गर्दी होत आहे. मागील वर्षी फेब्रुवारी – मार्च मध्ये पावसाच्या सरी येत असल्यामुळे तापमानात फारशी वाढ झालेली नव्हती. सध्या फेब्रुवारीपासूनच उन्हाचा कडाका जाणवत असल्यामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच फॅमिली दवाखान्यात गर्दी वाढत आहे. कमी झालेला पाऊस काळ, वाढते प्रदूषण या कारणामुळे येत्या काळात सोलापूर शहर-जिल्ह्यात तापमान वाढत राहण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शनिवारी कमाल तापमान ४१.६ तर किमान तापमान २७.२ इतके होते. हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असली तरी, या तापमानाचा रंगपंचमी सणाच्या उत्सवावर तितकासा परिणाम दिसून आला नाही.