छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून छत्रपती संभाजीनगर, जळगावला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली विभागात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक धरणांची पाणी पातळी वाढली असून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांपासून मराठवाडा व विदर्भासह राज्यातील काही विभागांत कोसळधार सुरू आहे. सोलापुरात सात तासांत १ इंच पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील २६ मंडळांत अतिवृष्टी झाली. शनिवार ते रविवार या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५६ मिमी पावसाची नोंद झाली, तर हिंगोलीत पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने २५ कुटुंबांमधील २०० जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नांदेडच्या विष्णुपुरीचा एक दरवाजा उघडला आहे. बीडमध्ये बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. पुराच्या शक्यतेने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरातही रविवारी रात्री पावसाला सुरुवात झाली हाेती.
हिंगोलीत शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे वस्त्यांमध्येही पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. तर हिंगोलीत रात्रीपासून 44 शेतकरी अडकले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आमदार संतोष बांगर हे दाखल झाले आहेत.