मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विविध भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर राहील, भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व परभणी जिल्ह्यांनाही सरींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 ते 16 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील. कोकण व गोव्यात सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मुंबईत अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात नागपूर, अमरावती व अकोला जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली व संभाजीनगर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल.
सोलापूर शहरात बुधवारी पहाटे दमदार पाऊस झाला. मध्यरात्री 2 ते पहाटे 5.30 पर्यंत पाऊस सुरू होता. या अडीच तासांच्या काळात तब्बल 37.4 मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. तसेच रात्री बाराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
दरम्यान, आजपासून चार दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजही दमदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मध्यरात्रीनंतर वातावरणात बदल होऊन पहाटेच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. हा पाऊस शहरात सर्वत्र होता. शिवाय शहर परिसरातही बरसला. पाऊस आल्याने बुधवारी कमाल तापमानात 2.3 अंशाने घटून 32.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सध्या परतीच्या पावसासाठी पोषक स्थिती आहे. हा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. परंतु सातत्य नसणार आहे. अधून-मधून दमदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान शास्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितला आहे.
गेल्या चार दिवसात तापमानात सतत वाढ होत राहिले. तापमान वाढीमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. 9 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. परिणामी, उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला होता. तापमान वाढीमुळे हवेचे दाब 1003 हेप्टापास्कलपर्यंत खाली आले. सध्या परतीच्या पावसासाठी पोषक स्थिती आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात आजपासून 14 सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. चार दिवसात दररोज किमान 10 ते 15 मिलिमीटर पाऊस बरसेल. शिवाय प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.