ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस : ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यंदाच्या पावसाने केले आहे तर दुसरीकडे आता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनने दमदार हजेरी लावली असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा आणि सातारा येथे २६ मे विजा, मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरसाठी २७ मे ही रेड अलर्ट कायम आहे.

कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. बुधवारनंतर पालघर, ठाणे आणि मुंबईत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तो कायम राहील. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आजपासून बुधवारपर्यंत पावसाचा जोर राहील, तर सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथेही जोरदार पाऊस पडेल.

मराठवाड्यात बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे पाच दिवस पाऊस कायम राहील. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रशासनाने सखल भागात सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!